मंगळवार, ३० मार्च, २०२१

बाबांची फुलं..

शुक्रवार दि. २६ मार्च २०२१
नंदा शामराव रावण

जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹


मी आज दुपारी सहज आडवी पडले असताना थोडासा डोळा लागला, तेव्हा मला एक स्वप्न - दृष्टांत झाला..

स्वप्नमध्ये मी नेमकं कुर्ल्यात होते की, आणखीन कुठे ते कळलं नाही.. सुरुवातीला तिथे आई दिसल्या. बाबा कुठे दिसत नव्हते.. आपले बरेच साधक मंडळी तिथे दिसत होते, पण चेहरा कोणाचा नीट दिसत नव्हता. फक्त सतिशचे बाबा तिथे दिसत होते. गोदा आत्ती सुद्धा दिसत होत्या.

तीर्थाचा कार्यक्रम चालू होता. तेंव्हा मी आतल्या खोलीतून बाहेर आले, आणि मी येताच आई तिथेच बाजूला असलेल्या त्यांच्या बिछ्यान्यावर पांघरून घेऊन झोपल्या. आईंच्या जवळच गोदा आत्ती बसल्या होत्या.

आई झोपताच मी त्यांना मिठी मारली, आणि विचारलं, ... "मी आल्या - आल्या तुम्ही का झोपलात?"

तेंव्हा आईंनी सुद्धा मला मिठी मारली आणि रडू लागल्या.. मी आईंना म्हणाले की, "पौर्णिमेला पोळ्या आणायच्या आहेत.." ... तेंव्हा आई जागेवर उठून बसल्या आणि माझ्या कानात काहीतरी सांगू लागल्या.. नेमकं काय सांगत होत्या ते मात्र काही कळलं नाही.. त्या वेळी तिथे बाबा दिसले, तेंव्हा बाबा आईला म्हणाले की, "मला फुलं दे! नंदाला द्यायची आहेत!"

बाबांचं बोलणं मला नेमकं काही कळेना.. आई पण म्हणाल्या की, "नंदाला आता फुलांची गरज नाही, तिला तीर्थ द्या..."

तेंव्हा बाबा म्हणाले, "मला तिला फुलचं द्यायची आहेत..!"

फुलांवरून आई आणि बाबांचं नजरेनेच काहीतरी बोलणं चालू होतं.. मग मी सुद्धा आईंना म्हणाले, "आई मला फुलं नको.." ... असं दोन वेळा म्हणाले..  आणि नंतर.. "माझ्या ऐवजी सतिशला द्या ही फुलं.." असं मी आईंना सांगितलं..

"सतिशला द्यायचं ते मी बरोबर द्यायला सांगणार, तू आता ही फुलं घे..! बाबांचा शब्द राख.. आणि पुन्हा बाबांच्या चरणांवर ठेव.." ... असं म्हणून आईंनी बाबांकडे फुलं दिली ..

तेंव्हा आईंनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी माझ्या हातात पांढरी शुभ्र फुलं ठेवली.. आणि मी बाबांना नमस्कार करून पुन्हा ती फुलं त्यांच्या चरणांवर अर्पण केली. 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹


जय गुरुदेव 🙏🏻🌹🙏🏻🌹

शुक्रवार, १९ जून, २०२०

शांतीब्रह्म - एक अनुभव

सतिश शामराव रावण

जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹

१६ एप्रिल २०२०

तो सुद्धा गुरुवारचाच दिवस होता.. संध्याकाळी ५ ची वेळ.. संपूर्ण जग कोरोनामूळे lock-down असल्यामुळे आहे तो वेळ सार्थकी लावावा म्हणून नेहमीप्रमाणे बाबा प्राणायाम करत बसले होते.

आई स्वयंपाक घरात उन्हाळी चटणीची तयारी करत होती.. त्यामुळे लाल मिरचीचा ठसका थोडाफार हवेत जाणवत होता.. तेच निमित्त साधून मी प्राणायाम करायला टाळलं..

माझी टाळाटाळ बघून स्वतः प्राणायाम करत बसलेले बाबा चिडले आणि माझा उद्धार सुरु झाला.. "तुम्हाला सगळं फुकट मिळालंय, परिस्थितीची जाण नाही, काही ऐकायला नको, फक्त निमित्त शोधत असता.... वगैरे... वगैरे... वगैरे ..."

मी सोफ्यावर शांत चित्ताने बसून शून्य नजतेने TV कडे बघत होतो. बाबा बोलत होते आणि मी तसाच शून्य नजरेने TV कडे बघत असताना तिथे सोफ्यावर असलेलं शांतिब्रह्म पुस्तक माझ्या नजरेस पडलं.. पुस्तक हातात घेतलं आणि सरळ शेवटचा धडा उघडला आणि वाचायला सुरुवात केली. वाचत असताना बाबांचे स्वर कानांवर पडत होते. पण ते शब्द कानात शिरू न देताच मी वाचत होतो..

वाचत असताना काही वेळाने बाबांचं बोलणं.. TV चा आवाज.. आईची स्वयंपाक घरातील खुडबुड, या सगळ्याचा आवाज माझ्या कानांवर पडेनासा झाला..


एकनाथांनी नाक धरून डोळे मिटले. "पांडुरंग हरी, वासुदेव हरी" म्हणून पाण्यात बुडी मारली व लगेच वर आले. सद्गुरुनाथऽ' अशी साद घालून दुसरी बुडी मारली. तिसरी बुडी मारताना "जय जनार्दन" अशी गर्जना केली व ते पाण्याखाली गेले. हा जणू त्यांचा 'देहअर्घ्य'च होता. कारण थोडा वेळ झाला तरी नाथ वर येईनात. लोकगंगेत खळबळ माजली. सर्वांची अंत:करणे भयभीत झाली. लोक ओरडू लागले. "नाथमहाराज बुडाले की काय? त्यांनी देह समर्पण केला की काय?" काहीजण तर अक्षरशः रडू लागले. काही हाका मारू लागले. किनाऱ्यावर एकच गडबड गोंधळ उडाला. सारा कोलाहल माजला. शातिब्रह्माच्या न दिसण्याने सारी अशांतता पसरली. एकनाथांनी बुडी मारली होती त्या ठिकाणी ती कृष्णकमळे हिंदोळत होती. आसमंत निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघाला होता. पण सौंदर्यातली भीषणता मात्र आमजनता अनुभवीत होती. त्यांच्या काळीज हेलावणाऱ्या आरोळ्या भीतीने काळजीग्रस्त झालेले चेहरे व अशुभ शंकेने शोकाकुल झालेली हृदये मनाचा ठाव घेत होती.

एकनाथ महाराज्यांनी गोदावरीत बुडी मारल्याचं वर्णन वाचताना मी सुद्धा गोदावरीच्या किनारी उभा राहून नाथांना हाक मारत असल्याचं वाटलं आणि एक दिव्य असा मंद सुगंध मला जाणवला. जसं की, एकनाथांनी बुडी मारलेल्या ठिकाणी उमललेल्या त्या कृष्णकमळांचाच तो दिव्य सुगंध असावा.

एकनाथ महाराज्यांनी गोदातरीत समाधी घेतल्याचं वर्णन वाचत असताना काही काळ तो दिव्य सुगंध माझ्या नाकात दरवळत होता..

हा अनुभव सांगण्यासाठी त्याच संध्याकाळी मी बाबांना फोन केला.. २० मार्चपासून lock-down मुळे कुर्ल्याला जाणं बंद झालं होतं, त्यामुळे तब्बल एका महिन्याने माझं बाबांशी बोलणं झालं होतं.. बाबांचे शब्द कानांवर पडताच अमृतवाणी ऐकल्यासारखं वाटलं.. साक्षात भगवंतांच्या मुखातून गीता ऐकताना अर्जुनाला जसं वाटलं असावं, तसंच काहीसं वाटत होतं... या अनुभवाबद्दल बाबांना सांगितलं असता बाबा म्हणाले, "हा अतिशय दिव्य अनुभव आहे.."

मी बाबांना विचारलं की, "बाबा हा असा अनुभव येण्यामागे काय कारण असावं?"

तर बाबा म्हणाले की, "तुला कारण जाणून घेऊन काय करायचंय ? असा अनुभव आला ही चांगली गोष्ट आहे..! त्यासाठी भगवंतांचे आभार मान .."


मी "हो बाबा" म्हणालो, आणि थोडं बोलणं झाल्यानंतर बाबांना नमस्कार करून फोन ठेवला..




...अपूर्ण

#SrSatish🎭

   

गुरुवार, ४ जुलै, २०१९

बक्षीस 🏆🏅

जय गुरुदेव, 🌹🙏🏻
सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻

या घटनेला आज कित्तेक वर्षे लोटली आहेत, त्यातूनही भगवंतांना स्मरण करून आठवणींची पानं उलटून थोडं काही लिहिण्याचा एक प्रयत्न.



"...आणि आता पुढील पारितोषिक विजेते आहेत, सतिश शामराव रावण, मागील शैक्षणिक वर्षामध्ये १००% उपस्थिती बद्दल विशेष पारितोषिक!"


आमच्या कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे शब्द ऐकले आणि माझ्या नजरेपुढे ४-६ महिन्यांपूर्वीचा तो दिवस उभा राहिला.

माझं कॉलेज म्हणजे, शारदाश्रम विद्यामंदीर दादर. रोज सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० ही वेळ.

सकाळी ठीक ८ वाजता कॉलेजला जाण्यासाठी मी बस पकडायचो, बसने अंधेरीला जायचो तिथून ट्रेनने दादर गाठायचं. हा माझा नित्याचा प्रवास होता.

अंधुकसं आठवतंय, कदाचीत तो गुरुवारच असावा. नेहमीप्रमाणे ठीक सकाळी ८ वाजता मी बस पकडली. कोण जाणे, पण त्या दिवशी रस्ता काही संपत नव्हता. २०-२५ मिनिटांचं अंतर, तरीही जवळपास पाऊण तास होऊन सुद्धा बस मात्र अर्ध्या वाटेतच अडकली होती. सकाळच्या वेळी असणाऱ्या ट्राफिकमुळे बस अगदी गरतीच्या पावलांनी पुढे सरकत होती. मी मात्र घड्याळातील सरकणारे काटे बघून बेचैन होत होतो. मला काही करून १० पर्यंत कॉलेज गाठायचं होतं. नेहमीच्या मार्गावर काहीतरी काम चालू असल्यामुळे बस नवीन मार्गाने वळविली होती. उरलेलं अंतर चालत चालत अंधेरी स्टेशनला जावं म्हटलं तर, नवीन मार्गही अनोळखी होता.


आमच्या कॉलेजच्या एकंदर इतिहासात कदाचित मी पहिलाच विद्यार्थी असेन जो कॉलेज चालू झाल्यापासून एकही दिवस न चुकवीत १००% उपस्थिती टिकवून होतो.

त्यातूनच प्रत्येक मुलाला वेळेची शिस्त लागावी म्हणून आमच्या सरांचा एक अलिखित नियम होता. वेळेपेक्षा 15 मिनिटं जरी कोणी उशिरा आले तर त्यांची सरळ गैरहजेरी लागायची.

त्या दिवशीची एकंदर ट्रॅफिकची संपूर्ण परिस्थिती पाहता मला वाटत होतं की, आज नक्कीच आपल्याला उशीर होणार आणि कॉलेजला पोहोचायला साडेदहा वाजून जाणार, आणि आपली सुद्धा आज गैरहजेरी लागणार, आणि १००% उपस्थिती मध्ये खंड पडणार.

काही सुचत नव्हतं, तहानलेल्यास जसं प्रत्येक मृगजळी पाण्याचा आभास होतो, तसंच काहीसं मला घड्याळाच्या सरकणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत माझ्या नजरेसमोर दिसत होते ते म्हणजे आमचे कॉलेज. "बस मध्येच बसून राहिलो तर इथेच १० वाजतील." असा विचार करून चालत जाऊनच आता अंधेरी गाठायची ठरवलं. आणि बस मधून खाली उतरलो.


समुद्रात अगदी मध्यावर असलेल्या जहाजावरच्या पक्षाला जसं दाही दिशांना फक्त पाणीच पाणी दिसतं, तसं काहीसं मला दिसत होतं. बघावं तिकडे जणू काही प्रत्येकाला पहिल्यांदा जायची घाई असल्याप्रमाणे कर्कश्य हॉर्न वाजवत उभी असलेली वाहनच वाहनं.

माझ्या मनात मात्र 'स्टेशनला लवकर पोहचायचे' ही एकच इच्छा होती, त्यातूनच मी वाट काढत रस्त्याच्या कडेला येऊन स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. रस्ता अनोळखी असल्यामुळे मनात शंका होतीच की, "आपण चालतोय तो रस्ता बरोबर आहे का?"

गर्दीतून वाट काढत असतानाच माझ्या मागून कोणाचातरी आवाज माझ्या कानांवर पडला.

"बहुत जल्दी में हो क्या बेटा?"

मी चालता चालता सहज मागे नजर टाकली, गडद रंगाचा कोणतातरी शर्ट, पांढरीशुभ्र पँट, पायात काळे बूट, थोडासा सावळा रंग, साडेपाच सहा फुटांची उंची आणि चेहऱ्यावर एक निराळं तेज असणारी एक व्यक्ती दिसली, बहुदा हिंदी भाषीक असावी.


हा, थोड़ा लेट हुआ हैं, कॉलेज जाना हैं।

मी त्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणालो, आणि समोर असणारे दोन तीन रस्ते बघत एका ठिकाणी वळताच त्या व्यक्तीने मला अडवलं, ...आणि म्हणाली, "अरे बेटा, उधरसे नहीं, इस रास्तेसे चलो, स्टेशन नजदीक हैं।"

वास्तवीक मी नेमका कुठे चाललो आहे हे त्या व्यक्तीला माहितीही नव्हतं, तरीही माझा स्टेशनचा रस्ता चुकतोय हे कळताच मला योग्य मार्ग दाखवून माझ्यासोबत काही काळ चालत होती.

चालत चालतच आमचं संभाषण चालू होतं.

"कहाँ पढ़ते हो, कौनसा कॉलेज हैं?"

"दादर, शारदाश्रम विद्यामंदिर." मी मोजकेच उत्तर दिलं.

"अच्छा! सचिन तेंदुलकर वाला कॉलेज!"

मी चेहऱ्यावर एक स्मित आणत "हो" म्हणालो.

त्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नागणिक माझं आणि कॉलेज मधील अंतर कमी होत असल्याचं मला जाणवत होतं.

"टाइम क्या रहता हैं कॉलेज का?"

माझ्या सोबत चालतच ती व्यक्ती माझ्याशी बोलत होती.

"सुबह दस से साडेपांच."

"तो फ़िर आज लेट हो जाएगा."

"हा, थोड़ा लेट तो होगा आज।"

मी समोर बघत प्रश्नांची उत्तरं देत चालत होतो. प्रत्येक प्रश्नासोबत माझा स्टेशनला जाण्याचा मार्ग सोपा होत होता.

पाच - सात मिनिटांच्या सोबती नंतर त्या व्यक्तीने इशाऱ्यानेच मला एका वाटेकडे बोट दाखवून सांगितलं की, यहांसे जाव अब सीधा, ५ मिनिट में स्टेशन पहुंच जाओगे।" आणि त्या व्यक्तीने माझ्या सोबतची चाल थोडी मंद केली आणि माझ्या मागून चालू लागली.

मी मात्र वेळेत स्टेशन गाठायचं म्हणून मागे न बघताच चालू लागलो, पुढे चालत असताना माझ्या मागून चालत असलेल्या त्या व्यक्तीचा सहवास जाणवत होता. काही पावलं पुढे जाताच मला लक्षात आलं की, 'आपल्याला योग्य मार्ग दाखविणाऱ्या व्यक्तीला आपण Thank You बोललोच नाही.' आणि मी मागे वळताच माझ्या मागोमाग येणारी ती व्यक्ती अचानक दिसेनाशी झाली होती. चहू बाजूंना नजर फिरवली पण एखादी दिव्य व्यक्ती अचानक आसमंतात विलीन होऊन अदृश्य व्हावी तशी ती व्यक्ती नाहीशी झाली होती.

मी मागे फिरलो आणि स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. काही वेळाने स्टेशनला पोहचताच ट्रेन पकडून दादर गाठलं आणि कॉलेजला पोहचलो तेंव्हा जवळपास साडेदहा वाजले होते.

आता तर नक्कीच आपली गैरहजेरी लागणार असा विचार करत मी माझ्या वर्गात शिरलो. तसं पाहिलं तर सव्वादहाच्या सुमारास सगळ्यांची हजेरी घेऊन झालेली असते. मी वर्गात शिरलो. सरांनी फक्त एकच प्रश्न विचारला.

"आज उशीर का रे?"

"हो सर, आज थोडं ट्राफिक होतं म्हणून उशीर झाला."

याचकाने दात्याकडे काहीतरी मागावे अशा लिन भावनेने मी म्हणालो.

"बरं! बॅग ठेव आणि आधी हार घाल देवाला."

सरांनी रजिस्टर उघडलं आणि माझ्या नावापुढे A खोडून P लिहिलं.


मी पाहिलं तर देवाच्या फोटोंना आदल्या दिवशीचे कोमेजलेले हार तसेच होते. आमच्या वर्गातील देवघरात "श्री दत्तगुरूंचा त्रैमुखी" फोटो आणि गजानन महाराजांचा फोटो होता. कॉलेज चालू झाल्यापासून सरांनी देवपूजेची जबाबदारी मला दिली होती.

मी पटकन बॅग ठेवली आणि नेहमीप्रमाणे देवपूजा करायला गेलो. तेंव्हा मात्र निरभ्र आकाशात वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपल्याला कॉलेजला जाण्यासाठी होणारा उशीर बघता त्या अनोळख्या ठिकाणाहून वेळेत मार्ग काढून देणारी "ती व्यक्ती" म्हणजे इतर कोणी नसून "साक्षात भगवंत" असावेत.

आणि भगवंतांच्या कृपेने आमच्या कॉलेजच्या इतिहासातील प्रथमच आणि कदाचीत शेवटचं १००% उपस्थितीचं विशेष पारितोषिक मिळण्यास मी पात्र ठरलो. 🙏🌹💐🙏


...अपूर्ण


#SrSatish🎭

   

गुरुवार, ३० जून, २०१६

पाऊस आणि मी..

सतिश शामराव रावण..


जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹


गुरुवार दि. ३० जून २०१६

या वर्षी मान्सूनला वेळेत सुरूवात झाल्यामुळे २ - ४ दिवस पावसाच्या संततधारा कायम सुरू होत्या.

गुरुवारचा दिवस असल्यामुळे मला कुर्ल्याला जायचं होतं.. त्या दिवशी दिवसभर पाऊस थोडा मंदावला होता. पण रिपरिप पाऊस चालूच होता. माझा बाईक घेऊन कुर्ल्याला जाण्याचा बेत होता.. म्हणून दुपारी साडेचारच्या सुमारास पाऊस पूर्ण थांबला असताना मी निघालो.. घरातून निघताच मनातच भगवंतांना प्रार्थना केली की, "वरुण देवा आता अर्धा तास कृपा करा." असं म्हणून मी नामस्मरण करत कुर्ल्याच्या दिशेने निघालो.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होतीच.. २५ - ३० मिनिटांचं अंतर सर करण्यासाठी पाऊण तास लागत होता. कलीना युनिव्हर्सिटी जवळ येताच अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या. मी पटकन बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका दुकानाच्या शेड खाली उभा राहीलो.. कुतूहल म्हणून घड्याळात पाहीले तर, बरोबर ५ वाजून ३ मिनीटं झाली होती. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले आणि मनात एक विचार येऊन गेला.. "भगवंतांनी आपल्या प्रार्थनेचा शब्दशः अर्थ घेतला वाटतं, आणि बरोबर अर्ध्या तासांनी पाऊस सुरू झाला.."

काही मिनिटात तो पाऊस सुद्धा थांबला आणि सव्वापाचच्या सुमारास मी कुर्ल्याला घरी पोहचलो...

याबद्दल बाबांना सांगितल्यावर बाबा हसले आणि म्हणाले, "मनापासून भगवंतांना हाक मारली की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहचतो ."



या अनुभवावरुब असं जाणवलं की, हे संपूर्ण विश्व ज्या भगवंतांच्या पोटात सामावलं आहे त्याच विश्वव्यापी भगवंताच्या लेखी आपली छोटीशी का असेना, पण नोंद आहे.




...अपूर्ण


#SrSatish🎭