शुक्रवार, १९ जून, २०२०

शांतीब्रह्म - एक अनुभव

सतिश शामराव रावण

जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹

१६ एप्रिल २०२०

तो सुद्धा गुरुवारचाच दिवस होता.. संध्याकाळी ५ ची वेळ.. संपूर्ण जग कोरोनामूळे lock-down असल्यामुळे आहे तो वेळ सार्थकी लावावा म्हणून नेहमीप्रमाणे बाबा प्राणायाम करत बसले होते.

आई स्वयंपाक घरात उन्हाळी चटणीची तयारी करत होती.. त्यामुळे लाल मिरचीचा ठसका थोडाफार हवेत जाणवत होता.. तेच निमित्त साधून मी प्राणायाम करायला टाळलं..

माझी टाळाटाळ बघून स्वतः प्राणायाम करत बसलेले बाबा चिडले आणि माझा उद्धार सुरु झाला.. "तुम्हाला सगळं फुकट मिळालंय, परिस्थितीची जाण नाही, काही ऐकायला नको, फक्त निमित्त शोधत असता.... वगैरे... वगैरे... वगैरे ..."

मी सोफ्यावर शांत चित्ताने बसून शून्य नजतेने TV कडे बघत होतो. बाबा बोलत होते आणि मी तसाच शून्य नजरेने TV कडे बघत असताना तिथे सोफ्यावर असलेलं शांतिब्रह्म पुस्तक माझ्या नजरेस पडलं.. पुस्तक हातात घेतलं आणि सरळ शेवटचा धडा उघडला आणि वाचायला सुरुवात केली. वाचत असताना बाबांचे स्वर कानांवर पडत होते. पण ते शब्द कानात शिरू न देताच मी वाचत होतो..

वाचत असताना काही वेळाने बाबांचं बोलणं.. TV चा आवाज.. आईची स्वयंपाक घरातील खुडबुड, या सगळ्याचा आवाज माझ्या कानांवर पडेनासा झाला..


एकनाथांनी नाक धरून डोळे मिटले. "पांडुरंग हरी, वासुदेव हरी" म्हणून पाण्यात बुडी मारली व लगेच वर आले. सद्गुरुनाथऽ' अशी साद घालून दुसरी बुडी मारली. तिसरी बुडी मारताना "जय जनार्दन" अशी गर्जना केली व ते पाण्याखाली गेले. हा जणू त्यांचा 'देहअर्घ्य'च होता. कारण थोडा वेळ झाला तरी नाथ वर येईनात. लोकगंगेत खळबळ माजली. सर्वांची अंत:करणे भयभीत झाली. लोक ओरडू लागले. "नाथमहाराज बुडाले की काय? त्यांनी देह समर्पण केला की काय?" काहीजण तर अक्षरशः रडू लागले. काही हाका मारू लागले. किनाऱ्यावर एकच गडबड गोंधळ उडाला. सारा कोलाहल माजला. शातिब्रह्माच्या न दिसण्याने सारी अशांतता पसरली. एकनाथांनी बुडी मारली होती त्या ठिकाणी ती कृष्णकमळे हिंदोळत होती. आसमंत निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघाला होता. पण सौंदर्यातली भीषणता मात्र आमजनता अनुभवीत होती. त्यांच्या काळीज हेलावणाऱ्या आरोळ्या भीतीने काळजीग्रस्त झालेले चेहरे व अशुभ शंकेने शोकाकुल झालेली हृदये मनाचा ठाव घेत होती.

एकनाथ महाराज्यांनी गोदावरीत बुडी मारल्याचं वर्णन वाचताना मी सुद्धा गोदावरीच्या किनारी उभा राहून नाथांना हाक मारत असल्याचं वाटलं आणि एक दिव्य असा मंद सुगंध मला जाणवला. जसं की, एकनाथांनी बुडी मारलेल्या ठिकाणी उमललेल्या त्या कृष्णकमळांचाच तो दिव्य सुगंध असावा.

एकनाथ महाराज्यांनी गोदातरीत समाधी घेतल्याचं वर्णन वाचत असताना काही काळ तो दिव्य सुगंध माझ्या नाकात दरवळत होता..

हा अनुभव सांगण्यासाठी त्याच संध्याकाळी मी बाबांना फोन केला.. २० मार्चपासून lock-down मुळे कुर्ल्याला जाणं बंद झालं होतं, त्यामुळे तब्बल एका महिन्याने माझं बाबांशी बोलणं झालं होतं.. बाबांचे शब्द कानांवर पडताच अमृतवाणी ऐकल्यासारखं वाटलं.. साक्षात भगवंतांच्या मुखातून गीता ऐकताना अर्जुनाला जसं वाटलं असावं, तसंच काहीसं वाटत होतं... या अनुभवाबद्दल बाबांना सांगितलं असता बाबा म्हणाले, "हा अतिशय दिव्य अनुभव आहे.."

मी बाबांना विचारलं की, "बाबा हा असा अनुभव येण्यामागे काय कारण असावं?"

तर बाबा म्हणाले की, "तुला कारण जाणून घेऊन काय करायचंय ? असा अनुभव आला ही चांगली गोष्ट आहे..! त्यासाठी भगवंतांचे आभार मान .."


मी "हो बाबा" म्हणालो, आणि थोडं बोलणं झाल्यानंतर बाबांना नमस्कार करून फोन ठेवला..




...अपूर्ण

#SrSatish🎭