गुरुवार, ४ जुलै, २०१९

बक्षीस 🏆🏅

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सतिश शामराव रावण,
जून २०१९

जय गुरुदेव, 🌹🙏🏻
सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻


या घटनेला आज कित्तेत वर्षे लोटली आहेत, त्यातूनही भगवंतांना स्मरण करून आठवणींची पानं उलटून थोडं काही लिहिण्याचा एक प्रयत्न..



"...आणि आता पुढील पारितोषिक विजेते आहेत, सतिश शामराव रावण, मागील शैक्षणिक वर्षामध्ये १००% उपस्थिती बद्दल विशेष पारितोषिक!"

आमच्या कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे शब्द ऐकले आणि माझ्या नजरेपुढे ४-६ महिन्यांपूर्वीचा तो दिवस उभा राहिला..

माझं कॉलेज म्हणजे, शारदाश्रम विद्यामंदीर, दादर. रोज सकाळी १० ते ५.३० ही वेळ..

सकाळी ठीक ८ वाजता कॉलेजला जाण्यासाठी मी बस पकडायचो, बसने अंधेरीला जायचो तिथून ट्रेनने दादर गाठायचं. हा माझा नित्याचा प्रवास होता..

अंधुकसं आठवतंय, कदाचीत तो गुरुवारच असावा.. नेहमीप्रमाणे ठीक सकाळी ८ वाजता मी बस पकडली. कोण जाणे, पण त्या दिवशी रस्ता काही संपत नव्हता.. २०-२५ मिनिटांचं अंतर, तरीही जवळपास पाऊण तास होऊन सुद्धा बस मात्र अर्ध्या वाटेतच अडकली होती.. सकाळच्या वेळी असणाऱ्या ट्राफिकमुळे बस अगदी गरतीच्या पावलांनी पुढे सरकत होती.. मी मात्र घड्याळातील सारकणारे काटे बघून बेचैन होत होतो.. मला काही करून १० पर्यंत कॉलेज गाठायचं होतं.. नेहमीच्या मार्गावर काहीतरी काम चालू असल्यामुळे बस नवीन मार्गाने वळविली होती. उरलेलं अंतर चालत चालत अंधेरी स्टेशनला जावं म्हटलं तर, नवीन मार्गही अनोळखी होता.

आमच्या कॉलेजच्या एकंदर इतिहासात कदाचित मी पहिलाच विद्यार्थी असेन जो कॉलेज चालू झाल्यापासून एकही दिवस न चुकवीत १००% उपस्थिती टिकवून होतो..

त्यातूनच प्रत्येक मुलाला वेळेची शिस्त लागावी म्हणून आमच्या सरांचा एक अलिखित नियम होता.. वेळेपेक्षा 15 मिनिटं जरी कोणी उशिरा आले तर त्यांची सरळ गैरहजेरी लागायची..

त्या दिवशीची एकंदर ट्रॅफिकची संपूर्ण परिस्थिती पाहता मला वाटत होतं की, आज नक्कीच आपल्याला उशीर होणार आणि कॉलेजला पोहोचायला साडेदहा वाजून जाणार, आणि आपली सुद्धा आज गैरहजेरी लागणार, आणि १००% उपस्थिती मध्ये खंड पडणार..

काही सुचत नव्हतं, तहानलेल्यास जसं प्रत्येक मृगजळी पाण्याचा आभास होतो, तसंच काहीसं मला घड्याळाच्या सरकणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत माझ्या नजरेसमोर दिसत होते ते म्हणजे आमचे कॉलेज.. "बस मध्येच बसून राहिलो तर इथेच १० वाजतील.." असा विचार करून चालत जाऊनच आता अंधेरी गाठायची ठरवलं.. आणि बस मधून खाली उतरलो..

समुद्रात अगदी मध्यावर असलेल्या जहाजावरच्या पक्षाला जसं दाही दिशांना फक्त पाणीच पाणी दिसतं, तसं काहीसं मला दिसत होतं.. बघावं तिकडे जणू काही प्रत्येकाला पहिल्यांदा जायची घाई असल्याप्रमाणे कर्कश्य हॉर्न वाजवत उभी असलेली वाहनच वाहन..

माझ्या मनात मात्र 'स्टेशनला लवकर पोहचायचे' ही एकच इच्छा होती, त्यातूनच मी वाट काढत रस्त्याच्या कडेला येऊन स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.. रस्ता अनोळखी असल्यामुळे मनात शंका होतीच की, "आपण चालतोय तो रस्ता बरोबर आहे का..?"

गर्दीतून वाट काढत असतानाच माझ्या मागून कोणाचातरी आवाज माझ्या कानांवर पडला..

"बहुत जल्दी में हो क्या बेटा?"

मी चालता चालता सहज मागे नजर टाकली, गडद रंगाचा कोणतातरी शर्ट, पांढरीशुभ्र पँट, पायात काळे बूट, थोडासा सावळा रंग, साडेपाच सहा फुटांची उंची आणि चेहऱ्यावर एक निराळं तेज असणारी एक व्यक्ती दिसली, बहुदा हिंदी भाषीक असावी ती..

हा, थोड़ा लेट हुआ हैं, कॉलेज जाना हैं।

मी त्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणालो, आणि समोर असणारे दोन तीन रस्ते बघत एका ठिकाणी वळताच त्या व्यक्तीने मला अडवलं, ...आणि म्हणाली, "अरे बेटा, वहाँसे नहीं, इस रास्तेसे चलो, स्टेशन नजदीक हैं।"

वास्तवीक मी नेमका कुठे चाललो आहे हे त्या व्यक्तीला माहितीही नव्हतं, तरीही माझा स्टेशनचा रस्ता चुकतोय हे कळताच मला योग्य मार्ग दाखवून माझ्यासोबत काही काळ चालत होती..

चालत चालतच आमचं संभाषण चालू होतं,

"कहाँ पढ़ते हो, कौनसा कॉलेज हैं?"

"दादर, शारदाश्रम विद्यामंदिर." मी मोजकेच उत्तर दिलं.. 

"अच्छा! सचिन तेंदुलकर वाला कॉलेज!"

मी चेहऱ्यावर एक स्मित आणत "हो" म्हणालो..

त्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नागणिक माझं आणि कॉलेज मधील अंतर कमी होत असल्याचं मला जाणवत होतं..

"टाइम क्या रहता हैं कॉलेज का?"

माझ्या सोबत चालतच ती व्यक्ती माझ्याशी बोलत होती..

"सुबह दस से सड़ेपाँच"

"तो फ़िर आज लेट हो जाएगा.."

"हा, थोड़ा लेट तो होगा आज।"

मी समोर बघत प्रश्नांची उत्तरं देत चालत होतो. प्रत्येक प्रश्नासोबत माझा स्टेशनला जाण्याचा मार्ग सोपा होत होता.

पाच - सात मिनिटांच्या सोबती नंतर त्या व्यक्तीने इशाऱ्यानेच मला एका वाटेकडे बोट दाखवून सांगितलं की, "यहाँसे जाव अब सीधा, ५ मिनिट में स्टेशन पहुंच जाओगे।" आणि त्या व्यक्तीने माझ्या सोबतची चाल थोडी मंद केली आणि माझ्या मागून चालू लागली..

मी मात्र वेळेत स्टेशन गाठायचं म्हणून मागे न बघताच चालू लागलो, पुढे चालत असताना माझ्या मागून चालत असलेल्या त्या व्यक्तीचा सहवास जाणवत होता. काही पावलं पुढे जाताच मला लक्षात आलं की, 'आपल्याला योग्य मार्ग दाखविणाऱ्या व्यक्तीला आपण Thank You बोललोच नाही..' आणि मी मागे वळताच माझ्या मागोमाग येणारी ती व्यक्ती अचानक दिसेनाशी झाली होती. चहू बाजूंना नजर फिरवली पण एखादी दिव्य व्यक्ती अचानक आसमंतात विलीन होऊन अदृश्य व्हावी तशी ती व्यक्ती नाहीशी झाली होती..

मी मागे फिरलो आणि स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. काही वेळाने स्टेशनला पोहचताच ट्रेन पकडून दादर गाठलं आणि कॉलेजला पोहचलो तेंव्हा जवळपास साडेदहा वाजले होते.

आता तर नक्कीच आपली गैरहजेरी लागणार असा विचार करत मी माझ्या वर्गात शिरलो. तसं पाहिलं तर सव्वादहाच्या सुमारास सगळ्यांची हजेरी घेऊन झालेली असते. मी वर्गात शिरलो. सरांनी फक्त एकच प्रश्न विचारला..

"आज उशीर का रे?"

"हो सर, आज थोडं ट्राफिक होतं. म्हणून उशीर झाला.."

याचकाने दात्याकडे काहीतरी मागावे अशा लिन भावनेने मी म्हणालो..

"बरं! बॅग ठेव आणि आधी हार घाल देवाला.."

सरांनी रजिस्टर उघडलं आणि माझ्या नावापुढे A खोडून P लिहिलं.

मी पाहिलं तर देवाच्या फोटोंना आदल्या दिवशीचे कोमेजलेले हार तसेच होते. आमच्या वर्गातील देवघरात "श्री दत्तगुरूंचा त्रैमुखी" फोटो आणि गजानन महाराजांचा फोटो होता. कॉलेज चालू झाल्यापासून सरांनी देवपूजेची जबाबदारी मला दिली होती.

मी पटकन बॅग ठेवली आणि नेहमीप्रमाणे देवपूजा करायला गेलो. तेंव्हा मात्र निरभ्र आकाशात वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपल्याला कॉलेजला जाण्यासाठी होणारा उशीर बघता त्या अनोळख्या ठिकाणाहून वेळेत मार्ग काढून देणारी "ती व्यक्ती" म्हणजे इतर कोणी नसून "साक्षात भगवंत" होते..

आणि भगवंतांच्या कृपेने आमच्या कॉलेजच्या इतिहासातील प्रथमच आणि कदाचीत शेवटचं १००% उपस्थितीचं विशेष बक्षिस मिळण्यास मी पात्र ठरलो.. 



...अपूर्ण

#SrSatish🎭